खेळण्या-बागडण्याच्या वयातच नियतीचा खेळ; वादळात सिमेंटचा खांब कोसळल्याने १२ वर्षीय फरहानचा दुर्दैवी अंत

solapur news | नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर हेलावून गेला होता
खेळण्या-बागडण्याच्या वयातच नियतीचा खेळ; वादळात सिमेंटचा खांब कोसळल्याने १२ वर्षीय फरहानचा दुर्दैवी अंत
Published on
Updated on

गुळवंची : निसर्गाचे चक्र कधी फिरेल याचा नेम नसतो, पण आज तळे हिप्परगा येथे निसर्गाच्या कोपाने एका हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी केली. ज्या वयात हातामध्ये खेळणी आणि दप्तर असायला हवे, त्या वयात १२ वर्षीय फरहान असलम कल्याणी याला काळाने हिरावून नेले. या घटनेने केवळ एक मुलगा गेला नाही, तर एका कुटुंबाने आपला भविष्याचा आधार गमावला आहे.

फरहान हा स्वभावाने अत्यंत मनमिळावू आणि अभ्यासात हुशार मुलगा होता. सायंकाळच्या वेळी तो घरात आपल्या भविष्याची स्वप्ने पाहत बसला असतानाच, अचानक आलेल्या मृत्यूच्या वादळाने क्षणात घात केला. सिमेंटचा तो खांब केवळ घराचा आधार नव्हता, तर तो फरहानच्या डोक्यावर पडलेला काळाचा प्रहार ठरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला पाहून आई-वडिलांनी केलेला टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

"फरहान मोठा होऊन कुटुंबाचे नाव काढेल, गरिबीतून घराला बाहेर काढेल," अशी आशा त्याचे वडील असलम कल्याणी बाळगून होते. मात्र, एका क्षणाच्या वादळाने कल्याणी कुटुंबाचे स्वप्न धुळीस मिळवले. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, तेव्हा त्याच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर हेलावून गेला होता.

अकाली मृत्यूने मोठी पोकळी

तळे हिप्परगा गावातील गल्लीबोळात ज्याच्या हसण्याने चैतन्य असायचे, तो फरहान आता कधीच दिसणार नाही या कल्पनेनेच गावकरी सुन्न झाले आहेत. सण असूनही आज गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. नियतीच्या या क्रूर खेळावर गावातून तीव्र दुःख व्यक्त होत असून, कल्याणी कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news