

बार्शी : राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या बोगस बियाण्याच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला आहे. पांढऱ्या कपड्यातील लोकांकडूनच शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शेतकरी बांधव करत आहेत. उडदाच्या निर्मल कंपनीच्या नावाने बोगस बियाणे विक्रीचा हा धंदा अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरू होता, अशी चर्चा आता उघडपणे होत आहे.
संपूर्ण राज्यात उडदाच्या निर्मल वाणाचा तुटवडा असताना बार्शी शहरात मात्र या बियाण्याची वाणवा कधीच जाणवली नाही. यावरूनच बार्शीकर शेतकरी वर्षानुवर्षे फसवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या दुकानदारांनी हे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकले, त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मागील अनेक वर्षांच्या नुकसानीचा मावेजा वसूल करून तो संबंधित शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणामुळे राज्याच्या कृषी विभागाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना कृषी विभाग नेमके काय करत होता, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. केवळ बार्शीच नव्हे तर सोलापूरसह राज्यातील अनेक दुकानदारांमार्फत हे बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. शेतकरी संघटनांनी या प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. शासनाने बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी बनवलेल्या कायद्याची प्रमाणिकपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. तरच भविष्यात शेती आणि शेतकरी टिकेल, तसेच फसवणूक करण्याचे धाडस कोणी करणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
कृषी विभागाने राज्यभर विशेष मोहीम राबवावी. ज्या दुकानदारांकडे अजूनही असे बोगस बियाणे शिल्लक आहे आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले आहे, त्याचा शोध घ्यावा. भविष्यात होणाऱ्या फसवणुकीपासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. पोलीस प्रशासनाने देखील या प्रकरणात फक्त कागदी घोडे न नाचवता ठोस कारवाई करावी. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या मालावरच सर्वांचे पोट भरते, याची जाणीव ठेवून पोलिसांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
बार्शी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पेरणी होऊनही उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट यापूर्वी अनेकदा उभे राहिले होते. बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज यांचा डोंगर वाढत आहे. जर दरवर्षी अशाच पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होत राहिली तर शेतकरी आत्महत्या रोखणे कोणालाच शक्य होणार नाही, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.