

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत दक्षिण तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील गोवा बनावटीच्या दारूचा कारखाना उध्वस्त केला. 12 लाख 70 हजार 320 रुपयांची गोवा बनावटीची देशी विदेशी दारू जप्त केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मुळेगाव तांडा येथील स्वामी विवेकानंद नगर येथे गोवा बनावटीच्या दारूचा अवैध कारखाना सुरू आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन सप्टेंबर रोजी या कारखान्यावर धाड टाकली. तेथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या 750 मिलीच्या एकूण 936 सीलबंद बाटल्या, 180 मिलीच्या 192 सीलबंद बाटल्या, बनावट देशी मद्याच्या 90 मिलीच्या 8 हजार 900 सीलबंद बाटल्या, विविध ब्रॅण्डचे 1हजार 500 बनावट लेबल व 9 हजार 500 बनावट टोपण, विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण 12 लाख 70 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी शिशुपाल धनू राठोड हा फरार झाला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याने ऑगस्ट महिन्यात 249 गुन्हे दाखल करून 233 जणांवर कारवाई केली आहे. यात 50 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ओ व्ही घाटगे, आर. एम. चवरे, समाधान शेळके, सुखदेव सिद, शिवकुमार कांबळे, धनाजी पोवार, सचिन शिंदे, रमेश कोलते, राम निंबाळकर, अंजली सरवदे, मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, तानाजी जाधव, कपिल स्वामी, नंदकुमार वेळापूरे, चेतन व्हनगुटी, अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, अण्णासाहेब फड, वसंत राठोड, शिवानी मुढे, दीपक वाघमारे, सानप, दिपाली सलगर यांनी पार पाडली. सदर गुन्याचा तपास समाधान शेळके करीत आहेत.