

सोलापूर : बाळे स्टेशनजवळ रेल्वे रुळाचे निरीक्षण करताना रेल्वे इंजिनिअरचा गाडी क्रमांक (22881) पुणे-भुवनेश्वर साप्ताहिक एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. श्रीमंत सोमन्ना पुजारी (वय 50, रा. बोरोटी) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्यांचे नाव आहे.
श्रीमंत पुजारी हे बाळे येथे रेल्वे रुळाचे गुरुवारी (दि. 13) निरीक्षण करीत होते. यात त्यांना गाडी आलेला अंदाज न आल्याने त्यांना रेल्वेची जोरदार धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
श्रीमंत पुजारी हे बोरोटी येथे गँगमन म्हणून काम करीत होते. मागील पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना प्रमोशन मिळून ते सोलापूर विभागीय कार्यालय येथे ज्युनियर इंजिनिअरिंग विभागात इंजिनिअर म्हणून रुजू झाले होते. पुजारी हे मूळचे बोरोटी येथील रहिवासी आहेत. या दुर्दैवी घटनेत कर्ता पुरुष गमावल्याने पुजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बाळे स्टेशन येथे घडली. पुजारी यांचा मृत्यू झाल्याचे कळताच सर्वांनाच अश्रू अनावर झाले.