

सोलापूर : जुळे सोलापूर येथील महावितरणचा सहायक अभियंता अमित रेडेकर तीन हजारांची लाच घेताना शनिवारी (दि. 24) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. घरावरील सोलर सिस्टीमच्या अर्जाला मंजुरी देण्यासाठी लाच घेताना सहायक अभियंता ट्रॅप झाल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे ग्राहकांच्या मागणीनुसार घरांवर सोलर सिस्टीम बसविण्याचे काम करतात. जुळे सोलापूर येथील एका ग्राहकाच्या घरावर 3.5 किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता. सदर अर्जास मंजुरी देण्याची जबाबदारी सहायक अभियंता रेडेकर यांच्याकडे होती. मात्र, प्रति किलोवॅट 1,000 रुपये या प्रमाणे तीन किलोवॅटसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. या संदर्भात तक्रारदाराने शुक्रवारी (दि. 23) जानेवारीला सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शनिवारी एसीबीने सापळा रचत सहायक अभियंता रेडेकर यांना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विजापूर नाका पोलिस ठाण्यात सुरू आहे.
लाच मागितल्यास तत्काळ करा तक्रार
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणाऱ्या एजंटाकडून शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.