

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपुरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. मुख्य रहद्दारीच्या रस्त्यांवर अतिक्रमणे करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. तर नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या फुटपाथावर चहा, केशकर्तनालये, हातगाडे यांनी ठाण मांडले आहे. यामुळे फुटपाथ असून अडचण तर नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे. वाढत्या अतिक्रमणावर नगरपालिकेने हातोडा चालवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी शहरात दररोज लाखो भाविक येत आहेत. तर हजारो वाहनांची ये-जा सुरु आहे. शहरातील नागरिक व बाहेरुन आलेले भाविक यांच्यामुळे पंढरीत नेहमी गर्दी असते. रस्त्यावरुन वाहने धावतात, तर फुटपाथावरुन पादचारी नागरिक ये-जा करतात. मात्र, सद्यस्थितीत फुटपाथवर चहाचे गाडे, पानटपरी, मेडिकल व दुकानांचे फलक यांनी अतिक्रमण केले आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर विशेषत: फुटपाथवर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे फुटपाथावरुन ये- जा करणार्या नागरिकांना भर रस्त्यातून चालत जावे लागत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रस्ते अपघात होऊ नयेत म्हणून शहरात मुख्य रस्त्यांवर फुटपाथ बनवण्यात आले आहेत. मात्र, फुटपाथावर वाढते अतिक्रमण पाहता फुटपाथ हे व्यावसायिकांचे केंद्र बनत चालले असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसभर व रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने फेरीवाले, हातगाडीवाले व स्थानिक लोक फुटपाथवर अतिक्रमण करत व्यवसाय करत आहेत. तर रात्रीच्या वेळी फुटपाथाऐवजी रस्त्यावरुन पायी चालत जाणार्यांना वाहनाची धडक बसण्याची भीती असते. त्यामुळे जीव मुठीत धरुन नागरिकांना पायी चालत ये-जा करावी लागत आहे. दरम्यान, शहरातील व उपनगरातील अनेक फुटपाथांकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले असल्यामुळे फुटपाथाची पडझड झालेली आहे. अनेक ठिकाणी काटेरी झाडेझुडपे उगवली आहेत. तर अनेक ठिकाणी फुटपाथावर चेंबर तयार झाले आहेत. यामुळे फुटपाथाचा वापर होताना दिसत नाही. दरम्यान, शहरातील विशेषत: रस्त्यावरील व फुटपाथावरील अतिक्रमण हटविण्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. वरिष्ठंकडे याबाबत चर्चा करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.