

करमाळा : कंदरवरून जाणाऱ्या सातोली ते केम या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. ऊस वाहतूक व अवजड वाहनांना रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा सातोली कंदर मार्गावर 7 जानेवारी रोजी 11 वाजता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
कंदर ते केम हे 17 किलोमीटरचे अंतर असून, केम हे महाराष्ट्राच्या नकाशावरील महत्त्वाचे गाव आहे. केम हे कुंकवाचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे असणारे कुंकवाचे कारखाने जगप्रसिद्ध आहेत. कुंकवाची वाहतूक करण्यासाठी मोठमोठी अवजड वाहने येतात. त्याचप्रमाणे सातोली हे गाव बागायती असल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर उसाची वाहतूक याच रस्त्याने केली जाते. मोठ्या प्रमाणावर केळी लागवड असल्याने केळीचे वाहतूक करण्यासाठी येथे वाहनांची सतत ये-जा असते.
मात्र, रस्त्याचे कारण पुढे करीत सध्या वाहनधारक या रस्त्याने येण्यास नकार देऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बसेस याच रस्त्याने जातात. या रस्त्यामुळे या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान या रस्त्यामुळे होताना दिसत आहे. या रस्त्यावर डांबराचा पत्ताच राहिलेला नाही. विशेष म्हणजे येथील स्थानिक लोकांनी स्वखर्चाने काही खड्ड्यावर मुरूम टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.