

टेंभुर्णी : टेंभुर्णी ग्रामपंचायतच्या वतीने अतिक्रमाबाबत धडाकेबाज कारवाई केली असून चोख पोलीस बंदोबस्तात टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालया समोरील आठ व ग्रामपंचायत आवारातील एक अशी नऊ अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती सरपंच सुरजा बोबडे यांनी दिली.अतिक्रमण काढल्यामुळे शहराने मोकळा श्वास घेतला.
सरपंच सुरजा बोबडे यांनी सांगितले की, टेंभुर्णी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोहिमेत सहभागी घेतला आहे.या अनुषंगाने ग्रामपंचायतने गेल्या तीन महिन्यापासून स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील सामाजिक संघटना,शैक्षणिक संस्था, महिला मंडळे, बचत गट हे सर्वजण सहभागी झाले होते.टेंभुर्णी ग्रामपंचायत परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला होता. तसेच संरक्षण भिंत बांधावयाची होती त्यास निधी मंजूर झाला होता.
टेंभुर्णी ग्रापंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये स्पर्धेच्या रेस मध्ये होती. या स्पर्धेसाठी अतिक्रमण अडसर ठरत होते.हे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे यासाठी त्यांना सूचना करण्यात आली होती. नोटीस देवून वारंवार प्रयत्न करण्यात आले,सांगण्यात आले. त्याकडे त्यांनी जाणून-बुजून दुर्लक्ष केले.नोटीसही घेत नव्हते.सर्व पर्याय संपल्याने शेवटी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला. अतिक्रमण काढण्यासाठी सकाळी मोठा पोलीस फौजफाटा, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. पोलिस फौजफाटा पाहून ग्रामपंचायत कंपाउंड जवळील आठ अतिक्रमणे अनेकांनी स्वतःहून काढण्याची तयारी दर्शवून ते काढून घेतले.तर कंपाऊंडमध्ये असलेले ललिता बाळासाहेब पवार यांच्या राहत्या घराचे पत्राशेडचे अतिक्रमण बंदोबस्तात काढण्यात आले.या धाडसी कारवाईचे शहर वासियांतून स्वागत होत आहे.
यावेळी ग्राम पंचायत अधिकारी संजय साळुंके, विस्तार अधिकारी औदुंबर शिंदे व डी. एन. सुतार, उपसरपंच राजश्री नेवसे, योगेश बोबडे, जयवंत पोळ, गौतम कांबळे, बाळासाहेब ढगे हे सदस्य उपस्थित होते. या अभियानामध्ये काही व्यवसायिक मुद्दामहून कचरा, घाण कंपाउंडच्या आत आवारात टाकत होते. लहान मुलांना शौचास बसवीत होते. यामुळे भटक्या जनावरांचा वावर असायचा. सतत स्वच्छता करूनही ग्रामपंचायत समोर कचरा दिसत होता. त्यामूळे अतिक्रमण मोहीम राबविणे गरजेचे होते. या मोहिमेनंतर परिसर मोकळा झाला आहे.