

सोलापूर : सणासुदीच्या खरेदीला सुरुवात होत असतानाच देशातील इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसच्या ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. एक ऑक्टोबरपासून एअर कंडिशनर (एसी), एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किंमतीत पाच ते दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चा माल, वाहतूक खर्च आणि रुपयाच्या घसरणीमुळे या किंमती वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवाळी, दसरा आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढत असतानाच ही दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः एसीच्या किंमतींमध्ये सुमारे पाच ते आठ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. काही उत्पादकांकडून टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किंमतींमध्येही वाढ करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनामध्ये तांबे, स्टील, ॲल्युमिनियम, प्लास्टिक आणि क्रूड ऑईलपासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
विशेषतः एसी आणि रेफ्रिजरेटरच्या उत्पादनात तांब्याच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांमध्ये मेमरी चिप्सचा वापर होतो. त्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन, समुद्री मालवाहतूक आणि विमा खर्च वाढला आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी लागणारे अनेक महत्त्वाचे घटक आणि कच्च माल जागतिक पुरवठा साखळीतून येतात. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर घसरत चालल्याने त्याचा परिणाम इलेक्ट्रानिक्स वस्तूंच्या उत्पादनावर होत आहे.