सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. याठिकाणी पवित्रा स्नानासाठी तोबा गर्दी उसळली आहे. कुंभमेळ्यात गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने पापकृत्यातून मुक्ती मिळते व आपण पवित्र होतो, अशी श्रद्धा आहे. अगदी तसेच शारीरिक, मानसिक पावित्र्यासाठी एकादशी गरजेची आहे. एकादशीचे व्रत हे फक्त आध्यात्मिक नसून त्याला सामाजिक, आरोग्यविषयक असे अनेक पैलू आहेत. सोमवारी (दि. २४) माघ विजया एकादशीच्या (Vijaya Ekadashi 2025) निमित्ताने हा विशेष लेख....
जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा नव्हती गंगा गोदा, तेव्हा होती चंद्रभागा ॥
अशी महती असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपुरात सोमवारच्या (दि.२४) माघी विजया एकादशीनिमित्ताने भाविकांची दाटी आहे. पंढरपुरात एकूण चार मोठ्या वार्या भरतात. आषाढी ही सर्वात मोठी त्याखालोखाल मोठी असते ती कार्तिकी यात्रा. त्यापाठोपाठ असते ती माघी आणि त्यानंतर येते ती चैत्री यात्रा. याच माघ महिन्यातील वारी नंतरची ही दुसरी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. तसेही दर पंधरा दिवसांनी एक एकादशी असते. त्याला पंढरपुरकर शुद्ध व वद्यातील एकादशी म्हणतात. एकादशीचा उपवास हा फक्त आध्यात्मिक अंगाने न पाहाता त्याला सामाजिक, आरोग्यविषयक अशा अनेक अंगाने पाहायला हवे. कारण आध्यात्मिक इतकेच या दोन्ही अंगाने एकादशीचे महत्त्व खूप अमूल्य ठरते.
जनमानसाचे एकत्रीकरण : एकादशीच्या निमित्ताने असंख्य लोक प्रापंचिक व्याप सोडून आध्यात्मिक कारणाने एकत्रित येतात. यातून वैचारिक देवाणघेवाण होते. यावेळी होणार्या समाजप्रबोधनपर कीर्तन, प्रवचनातून वैचारिक घुसळण होते. नैतिक मूल्य, आत्मसंयमाची शिकवण यातून लाभते. यामुळे एकादशीच्या निमित्ताने होणारे हे जनमानसाचे एकत्रीकरण सामाजिक अंगानेही लाभदायी ठरते.
नीतिमत्ता संवर्धन : एकादशीचा उपवास, याकाळातील प्रबोधनात्मक वैचारिक विचार कानावर पडल्याने संयम, नितिमत्ता, परोपरकार, दानधर्म, सेवा अशा सामाजिक मूल्यांची जाणीव होते. यामुळे समाजात नीतिमत्तेचे संवर्धन होत समाज सन्मार्गी लागतो. शांतताप्रिय होत प्रगतीच्या पथावर अग्रेसर ठरतो.
सांस्कृतिक जपणूक : वारी, कीर्तन, प्रवचन, भजन ही मराठी सांस्कृतीची आभूषणं होत. त्या सर्वांचे एकादशीच्या निमित्ताने पुनःपुन्हा आचरण होते, संवर्धन होते. या वारंवारीतेमधून सांस्कृतिक जपणूक होते. एकादशीमुळे हा आपला वारसा अधिक वृद्धिंगत होत जातो.
शारीरिक वजन नियंत्रण : आपण दररोज आपल्या गरजेपेक्षा अधिकचे अन्न सेवन करतो. यामुळे आपले शाररिक वजन वाढत जाते. परंतु एकादशीच्या निमित्ताने एकभुक्त राहिल्याने, कमी खाल्याने, दुधहारी, फलहारी, निर्जळी, एकादशी केल्याने आपले शाररिक वजन थोडेफार घटून आपल्यात चपळता येते.
हृदयरूग्णांसाठी फलदायी : हल्ली ताणतणावामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे असेल, परंतु हृदयरूग्णांचे प्रमाण खूपच वाढत आहे. यावर मात करण्यासाठी एकादशीचे व्रत फलदायी ठरू शकते. एकभुक्त व अन्य कडक उपवास केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहून हृदयविकाराचा धोका थोडाफार कमी होण्यास मदत होते. अर्थात हा दावा व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो. परंतु हा एक फायदा एकादशीमुळे होऊ शकतो.
पचनसंस्थेस लाभदायी : दररोज आपण गरजेपेक्षा जास्त अन्नाचे सेवन करतो. यामुळे अनेक आजार डोके वर काढू लागतात. परंतु आपण एकादशी केल्याने किमान तेवढा एक दिवस तरी पचनसंस्थेस आराम पडून ते आपल्यासाठी लाभदायी ठरू शकते. पोट हलके राहून आपली त्या दिवसाची कार्यक्षमता वाढते.
या सर्व लाभाचा विचार करता एकादशीचे व्रत हे सर्वांसाठीच लाभदायी ठरते हे आपणांस दिसून येते. शारीरिक, मानसिक आरोग्यासाठीही एकादशीचे व्रत फलदायी ठरते. त्याशिवाय आपल्या प्राचीन प्रथा, परंपरांचेही जतन आपल्या हातून यानिमित्ताने होते. या सार्याचा विचार करता चला तर मग आपण सारे लहान-थोर मिळून आजच्या माघी एकादशीपासून हे व्रत स्वीकारूयात. महिन्यातील येणार्या दोन्ही किंवा किमान एक तरी एकादशी आपण करूयात.