

सोलापूर: सोलापूर शहरातील एका शैक्षणिक संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन पीडितेशी ओळख करून तब्बल ११ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी ८ आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर इतर ३ आरोपींना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. प्रवीण श्रीकांत राठोड, गणेश उर्फ अक्षय विष्णू चव्हाण, दिनेश परशु राठोड, सतीश अशोक जाधव, आनंद राम (राजवीर) राठोड, रोहित श्याम राठोड, चेतन राम राठोड, करण विजयकांत भरले, या आठ जणांना दुहेरी जन्मठेप तर सचिन श्रीकांत राठोड, राज उर्फ राजकुमार सिद्राम देसाई, गौरव विलास भोसले या तिघांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये पीडिता तिच्या घरातून त्या शिक्षण संस्थेत रिक्षातून जात होती. दीड महिन्यापूर्वी तिची ओळख आरोपी सचिन श्रीकांत राठोड (वय २४ )याच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याने पीडीतेला लग्नाचे अमिष दाखवून शहराबाहेरील लॉजवर अत्याचार केला. त्यानंतर तिला रंगभवन येथे सोडले. त्याचवेळी राज उर्फ राजकुमार सिद्राम देसाई (वय २3 )याने तिला रिक्षात बसवून नेले आणि एका मैदानावर अत्याचार केला. त्याच दिवशी पीडिता सायंकाळी पाचच्या सुमारास घराबाहेर पडली. त्यावेळी प्रवीण श्रीकांत राठोड याने रिक्षात बसवून शहराबाहेरील लॉजवर नेले आणि अत्याचार केला. तसेच त्याचा मित्र राजवीर यानेदेखील तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म केले त्यानंतर आणि तीन आरोपींना पीडित मुलीला वही देण्याचा बहाणा करून बोलावून घेवून शहराबाहेर जंगलात नेवून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक दुष्कर्म केले. तसेच अन्य आरोपींनी देखील कारमधून जुळे सोलापूर परिसरात घेवून तिच्यावर कारमध्येच अत्याचार केले होते.
या प्रकरणी अखेर पीडीत मुलीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून ११ आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यात पीडितेची तिची आई, ओळख परेड पंच, घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या गुन्ह्यामध्ये एकूण सात घटनास्थळे तपासण्यात आली आहेत. या गुन्ह्याबाबत न्यायालयामध्ये आठ दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी ही घटना कोणास सांगितली तर ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तीवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आठ आरोपींना वीस वर्षे शिक्षा तर सर्व आरोपींना एकुण 21 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत तर आरोपींतर्फे अॅड. नागराज शिंदे, अॅड. ईस्माईल शेख, अॅड. सुरेश चव्हाण, अॅड. एस.एम. झुरळे, अॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले.