

मंगळवेढा : मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा विचार तरुणाईमध्ये दारूची बाटली दूर करून दुधाची बाटली जवळ करण्याचे आकर्षण वाढावे म्हणून केला. हे मी एकट्याने करून चालणार नाही. सर्व स्तरातून तरुणाई व्यसनापासून परावृत्त व्हावी, म्हणून प्रयत्न आवश्यक, असे प्रतिपादन शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांच्यावतीने 11 जानेवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, क्रीडाप्रशिक्षक रामभाऊ दत्तू, अजय साळुंखे, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, प्रा. विनायक कलुबर्मै, मधुकर भंडगे, क्रांती आवळे, शॉरोन ढोबळे, गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, प्रकाश गायकवाड, नंदकुमार हावनाळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ढोबळे म्हणाले की, समाज घडला पाहिजे. समाजाची ताकद वाढली पाहिजे. सामाजिक परिवर्तन धुसर झाले आहे. तीन वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार होत आहेत. हे शिक्षणाचे अपयश आहे. याला शिक्षणाच्या संस्कारानेच उत्तर द्यावे लागेल. राजकारणी लोकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे माणुसकी जतन करण्याबद्दल राज्यपातळीवर प्रयत्न झाला पाहिजे, असे ढोबळे म्हणाले.
यावेळी 14 वर्षे वयोगटात दोन किमी अंतरातमध्ये 18 वर्षाखालील मुले चार किलोमीटरमध्ये सिध्दनाथ जगताप प्रथम (कराड), हर्ष खांडेकर व्दितीय (पाठखळ), वैभव ढगे तृतीय (भाळवणी), खुल्या गटात सहा किलोमीटरमध्ये सुशांत सरगर प्रथम (कोळा, सांगोला), निरंजन सूर्यवंशी व्दितीय (कराड), तुषार आलदर तृतीय (कोळा, सांगोला), विजेत्यांना 5 हजार, 3 हजार, 2 हजार, 1 हजार व उत्तेजनार्थ पाचशे रुपये यासह सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसासह सन्मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेस अॅड. सुजित कदम, शिवानंद पाटील, शिवाजीराव काळूंगे यांनी सहकार्य केले. तर स्पर्धेसाठी जयंत डोलारे, अंबादास पांढरे, चिदानंद माळी, चंद्रकांत लाड, महेंद्र शिंदे, तानाजी देशमुख, दादासाहेब वाघमारे, राजाराम दत्तू, आप्पासाहेब काटकर, सतीश कदम, कृष्णदेव चौगुले, दत्तात्रय धुळगुंडे, रामेश्वर भोसले, खंडाप्पा जिरगे, प्रशांत यादव, प्रवीण गुंड, सुनील साळे, प्रकाश माळी, डॉ. अशोक पाटील, संजय घोडके, विठ्ठल बगले, यशवंत चौगुले, आकाराम दुधाळे, श्रीकृष्ण कोळी, नानासाहेब खराडे, संजय भोसले आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक कांतीलाल इरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद कोरे यांनी केले. आभार बसवराज कोरे यांनी मानले.