Eknath Shinde | अक्कलकोटला एमआयडी मंजुरीसाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वळसंग : आगामी काळात तालुक्यात बेरोजगार कोणी दिसणार नाही, अक्कलकोटला एम.आय.डी. मंजुरीसाठी लवकरच उद्योगमंत्री उदय सामंतना पाठवणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथी शिवसेनेची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसभेला संबोधित केले. सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वळसंग येथील जाहीर सभेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, असा संदेश देत त्यांनी सर्व शिवसेना उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन करत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
वळसंग हे क्रांतिकारकांच्या आणि हुतात्माचे गाव असून यां ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनी यांनी वळसंग गावाला भेट दिली त्या पवित्र भूमीला वंदन करत, प्रचार करताना आपण संयम, साधेपणा आणि सकारात्मकता राखण्याचा सल्ला दिला. कोणत्याही टीका-टिप्पणीमुळे समाजातील भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगितले. या योजनेमुळे महिलांना थेट आर्थिक अधिकार मिळाल्याचा दावा करत, महिला बचत गट, स्वयंरोजगार, लघुउद्योग, उत्पादन केंद्रे आणि क्रेडिट सोसायट्यांच्या माध्यमातून हजारो महिलांना सक्षम बनवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सुरक्षित राहते आणि समाजाची प्रगती वेगाने होते, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे मंत्री दादा भुसे, माजी मंत्री सिद्धारामजी म्हेत्रे, शंकर म्हेत्रे आनंद तानवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख, मनीष काळजे, अमोल शिंदे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, शीतल म्हेत्रे, लक्ष्मीबाई रतिकांत पाटील, धनेश अचलेरे, अरिफ कुरेशी प्रवीण ताणवडे, कुंभारीचे इमडे, रोहित बिराजदार, व्यंकट मोरे, भरामशेट्टी आदी अक्कलकोट वं दक्षिण सोलापूर भागातील जिल्हपरिषद वं पंचायत समिती उमेदवार व मोठ्या संख्याने शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

