

सोलापूर : ढोर समाजाला सुशिक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी शिक्षणावर भर द्यावे, त्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
हुतात्मा स्मृती मंदिरात रविवारी दि. 29 रोजी झालेल्या ढोर समाजाच्या देशव्यापी स्नेह मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरण आणि समाजाच्या अडचणींवर सखोल चर्चा झाली. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली, तर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आरक्षण वर्गीकरणामुळे होणार्या अन्यायाविरोधात संघर्षाची आवश्यकता अधोरेखित केली. संयोजक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी समाजातील जनगणनेसाठी मोहीम राबवण्याचे आणि सक्षम व्यक्तींनी मागास समाजबांधवांना मदत करण्याचे आवाहन केले. मेळाव्याला आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून समाजबांधव उपस्थित होते.
संत कक्कय्या, शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. प्रविण होटकर आणि वनिता होटकर यांनी केले, तर आभार सटवाजी होटकर यांनी मानले. यावेळी सुधीर खरटकमल, अशोक सदाफुले, रविद्र शिंदे, अॅड. विद्या कटकधोंडा, मुन्ना कटके, सच्चिदानंद होटकर यांच्यासह अनेकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.