

सोलापूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस दलातील उत्कृष्ट अधिकार्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. सोलापूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांना उत्कृष्ट सेवा पदक तर माढा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर यांना शौर्य पदक जाहीर झाले. शहर पोलिस दलातील माहिती आणि दळणवळण विभागात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष देशपांडे यांना राज्य शासनाचा विशेष सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनुरचे आहेत. 1993 मध्ये त्यांची थेट पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. नाशिक येथे प्रशिक्षण संपवून त्यांना मुंबई येथे नियुक्ती मिळाली. 2011 पर्यंत त्यांनी मुंबई येथे विविध ठिकाणी सेवा बजावली. 2012 साली त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून नागपूर येथे बदली झाली. 2017-18 सांगली, त्यानंतर 2021 पर्यंत दहशतवाद विरोधी पथक, 2021 पासून सोलापुरात विविध पोलीस स्टेशन येथे कामगिरी बजावली. सहाय्यक आयुक्त म्हणून येथेच पदोन्नती मिळाली. सध्या ते शहर पोलीस दलात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत आहेत. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वीरीत्या तपास करून गुन्हे उघडकीस आणले. त्यांनी हे पदक पत्नी सौ. स्नेहलता यांना अर्पण केले आहे. पत्नीच्या पाठिंब्याशिवाय कोणतीही सेवा शक्य नाही, आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे माने म्हणाले.
माढ्याच्या बंडगर यांचा गौरव
सध्या माढा पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे कार्यरत असताना 3 मे 2017 रोजी कारमपल्ली येथील नक्षलवाद्यांच्या चकमकीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. अंबुश या गावामध्ये अडकलेल्या पोलीस जवानांचे त्यांनी प्राण वाचवले होते. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला.