

सोलापूर : सोलापूर-लातूर दरम्यान शनिवारी (दि.३०) ई-बस धावली. पहिल्या दिवशी ई-बसच्या दहा फेऱ्यामधून ३५० प्रवासी अन् ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. लवकरच एसटी प्रशासन साताऱ्यासाठी देखील ही सेवा सुरू करणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, शनिवारी ई-बसचे उद्घाटन सोलापूर आगारामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान गेल्या ७५ वर्षात एसटीत आमूलाग्र बदल झाले. परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा मानस महामंडळाचा होता. यापूर्वी सोलापूर-पुणे, अहमदनगर-पुणे तसेच राज्यातील इतरही मार्गावर सुरू आहे. सोलापूर मध्यवर्ती आगारातून पहिल्या दिवशी सोलापूर- लातूर दरम्यान धावणाऱ्या ई-बसचे लोकार्पण झाले. यावेळी चालक, वाहक तसेच कर्मचारी आणि प्रवाशांनी आपल्या मोबाइलमध्ये सेल्फी ई-शिवाई सोबत सेल्फी घेत आनंद घेतला. यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, सोलापूरचे आगार व्यवस्थापक उत्तम जुंधळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा.
- वातानुकूलित सेवा
- जीपीएससह मॉनिटरिंग सिस्टीम
- ताशी 80 किमीचा वेग
- दोन तासात पूर्ण होणार चार्जिंग
- एका चार्जरवर 300 किमीचा प्रवास
ई-शिवाईचे सोलापूर-लातूर प्रवासी भाडे पूर्ण तिकीट ३१५ रुपये ठेवण्यात आले आहे. शिवनेरी, शिवशाहीपेक्षाही शिवाईचा तिकीट दर कमी आहे. दररोज सोलापूर-लातूर-सोलापूर २० फेऱ्या असणार आहेत.