

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे वाढणाऱ्या थंडीत आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेथी लाडूसह सुका मेवा अर्थात ड्रायफ्रुट्ला मागणी वाढली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत काजू, बदाम, अंजीर, पिस्ता आदींच्या दरात झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हिवाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखले जावे यासाठी विविध पदार्थ, सुकामेवा खाण्यास पसंती दिली जाते. शहरामध्ये थंडीची चाहूल लागताच सुकामेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पाऊले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या गुलाबी थंडीतील बजेटवर याचा परिणाम झाला आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने काजू, बदाम, अंजीर, पिस्ता आदींच्या दरात वाढ झाली आहे.
भुसार गल्ली, मार्केट यार्ड, जोडभावी पेठ हा परिसर सुका मेव्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी मागच्यावर्षी पेक्षा थोडे भाव वधारलेले आहे. यंदा सुका मेव्याच्या दरात सुमारे पंधरा टक्क्याने वाढ झाल्याची माहिती विक्रेते शिवानंद सावळगी यांनी दिली. सोलापूर शहरात रत्नागिरी, गोवा, आंध्र प्रदेश येथून ड्रायफ्रूटची आवक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवाळा ऋतूत आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारवरही लक्ष केंद्रित केले जाते. या मोसमात जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढते. व्यायाम आणि वाढती भूक यांना पोषक असा आहार घेण्यासाठी डिंक, मेथी आदींपासून तयार केलेले लाडूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारिक, खोबरे आदींना प्रचंड मागणी असते. यंदाही थंडीचा प्रभाव जसजसा वाढू लागला आहे, तशी ड्रायफ्रूटची मागणी वाढू लागली आहे.
हिवाळयात वाढणारी भूक आणि पचनशक्ती यांच्यामुळे खास पदार्थ बनविण्यात येतात. त्यात डिंक लाडू आणि मेथीचे लाडू यांचे प्रमाण जास्त असते. ते बनविण्यासाठी डिंक, खारिक, खोबरे, तुप आदींचा वापर केला जातो. पचनासाठी जड असणारे या पदार्थाचे हिवाळ्यात चांगले पचन होते. यामुळे हिवाळ्य़ात थंडीचे प्रमाण वाढले की अनेक कुटुंबामध्ये सुक्यामेव्यापासून विविध पदार्थ बनविण्याची लगबग दिसून येत आहे.