

श्रीपूर : नागपूर ते गोवा या बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील जांभूड, विठ्ठलवाडी आणि माळखांबी परिसरात गुरुवारी (दि. ४ जून) ड्रोन सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेल्या फिक्स पॉईंटची उभारणी पोलिस बंदोबस्तात करण्यात आली.
शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात बागायती जमिनी बाधित होणार असल्याने शेतकरीवर्गातून या प्रकल्पास तीव्र विरोध होत आहे. शासनाकडून बाधित शेतकऱ्यांसाठी अद्याप ठोस पुनर्वसन अथवा भरपाई धोरण जाहीर करण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी विरोधाची भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ड्रोनच्या सहाय्याने अचूक मोजणी करण्यासाठी दिशादर्शक म्हणून फिक्स पॉईंटची आवश्यकता असल्याने महसूल विभागातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी व पोलिस पथक बुधवारी माळखांबी परिसरात दाखल झाले होते. निंबाळकर वस्ती, माळखांबी येथे सार्वजनिक रस्त्यावर फिक्स पॉईंटची उभारणी करण्यात आली.
यावेळी बाधित शेतकरी संभाजी निंबाळकर, लालासाहेब गुळूमकर, नारायण निंबाळकर, सुरेश निंबाळकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. फिक्स पॉईंटबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केल्यानंतर पोलिसांनी हा पॉईंट शेतजमिनीत नसून सार्वजनिक रस्त्यावर घेतला जात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी शांततेत सुरू असलेली कार्यवाही पाहिली. शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी विठ्ठलवाडी, माळखांबी, पालखी महामार्ग परिसर, जांभूड येथील नायकुडे वस्ती तसेच बोडके वस्ती आदी भागांत पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण प्रक्रिया शांततेत पार पडली.