

सोलापूर : वळसंगकर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बँक खात्याची चौकशी करण्याची मागणी संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने यांनी सदर बझार पोलीसांकडे अर्जाद्वारे केली आहे.
न्युरो सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणास वेगवेगळे वळण लागत आहे. सरकारी वकिलांच्या पत्रानंतर डॉ. उमा वळसंगकर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात अर्ज देऊन मनिषाच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर आता मनीषा मुसळे-माने यांनी सदर बझार पोलीसांना अर्ज दिला आहे. मी हॉस्पिटलमध्ये कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता बाहेर येण्यासाठी डॉ. शिरीष वळसंगकर, डॉ. उमा वळसंगकर, डॉ. आश्विन वळसंगकर, डॉ. शोनाली वळसंगकर यांच्या बँक खात्यांची तपासणी करून ऑडीट करावे असे अर्जात म्हंटले आहे.
डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येला मनीषा जबाबदार असल्याची फिर्याद डॉ. आश्विन यांनी दिली होती. त्या अनुषंगाने डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येचा तपास करताना मनीषाच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी झाली. दोषारोप पत्रामध्ये देखील आर्थिक बाबींसंदर्भात साडेतीनशे पाने जोडलेली आहेत.
मनीषा यांच्या बँक खात्याची सखोल तपासणी पोलीसांनी केली आहे. मनीषा यांच्या बँक खात्यात रक्कम कोठून आली याची तपासणी करण्यासाठी डॉ. शिरीष, डॉ. अश्विन, डॉ. उमा, डॉ. शोनाली यांच्या बँक खात्यांची कोणतीही चौकशी झालेली नाही. वस्तुस्थिती समोर येण्यासाठी हॉस्पिटलच्या हिशेबासाठी वापरले जाणारे स्वॉफ्टवेअर, दैनंदिन आयपीडी फाइल्सचेही लेखापरीक्षण व्हावे असे अर्जात म्हंटले आहे.