

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या वळसंगकर हॉस्पिटलच्या आवारातील घरामध्ये प्रवेश करण्याच्या कारणावरुन स्नुषा डॉ. शोनाली वळसंगकर व जावई सुजय फडके यांच्यात मोठा वाद झाल्याचा प्रकार समोर आला. हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. दोन्ही गटातील व्यक्तींच्या सदर बझार पोलिस ठाण्यात चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी सुजय यांच्यासह स्नेहा फडके व डॉ. उमा वळसंगकर हे पोलिस ठाण्यात येऊन गेले. रात्री उशीरा याबाबत दोन्हीकडील मंडळींना पोलिसांनी बोलावले होते.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या वर्षभरानंतर सून डॉ. शोनाली वळसंगकर या हॉस्पिटलमधील घरात आल्या असता जावई सुजय फडके यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्यातील भांडण मारामारीपर्यंत पोहोचले. डॉ. वळसंगकर रुग्णालय ही खासगी मालमत्ता आहे, यामध्ये डॉ. शोनाली यांचा काही संबंध नाही, त्यांनी येथे येऊ नये, असे सुजय फडके यांनी सांगितले. तर मी या घरची सून आहे, त्यामुळे मी येथे येणारच, असा रेटा डॉ. शोनाली यांनी लावला.
हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. आता या प्रकरणात दोन्ही गटातील व्यक्तींच्या पोलिस ठाण्यात चकरा सुरु आहेत. डॉ. शोनाली या बुधवारी पोलिस ठाण्यात येऊन गेल्या, त्यानंतर गुरुवारी सकाळी सुजय फडके, स्नेहा फडके व डॉ. उमा वळसंगकर हे पोलिस ठाण्यात येऊन गेले. पोलिसांनी त्यांना सायंकाळी येण्यास सांगितले. मात्र गुरुवारी रात्री आठपर्यंत सदर बझार पोलिस ठाण्यात दोन्हीकडील कुणीही आले नव्हते.
दरम्यान, दोन्ही गटाकडून पोलिस स्टेशनमध्ये वाद मिटविण्यासाठी चकरा सुरू आहेत की गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे हे समजू शकले नाही. शहरातील एका ज्येष्ठ विधिज्ञामार्फत घरगुती बैठकीत हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.