

सोलापूर : वळसंगकर हॉस्पिटलमधील घरामध्ये प्रवेश करण्यावरुन डॉ. शोनाली वळसंगकर व सुजय फडके यांच्यात मोठा वाद झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर आता संपत्तीवरुन वळसंगकर कुटुंबात पुन्हा संघर्ष पेटला आहे. याबाबत वळसंगकर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा आहेत.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या वर्षभरानंतर त्यांच्या कुटुंबातील वाद शिगेला पोहचला आहे. आत्महत्या झाल्यानंतर घराबाहेर पडलेल्या सून डॉ. शोनाली वळसंगकर या हॉस्पिटलमधील घरात आल्या असता जावई सुजय फडके यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्यातील भांडण मारामारीपर्यंत पोहचले. डॉ. वळसंगकर रुग्णालय ही खासगी मालमत्ता आहे यामध्ये डॉ. शोनाली यांचा काही संबंध नाही त्यांनी इथे येऊ नये असे सुजय फडके यांनी सांगितले. तर मी या घरची सून आहे त्यामुळे मी इथे येणारच असा रेटा डॉ. शोनाली यांनी लावला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.
दरम्यान या प्रकरणापूर्वी देखील डॉ. शोनाली आणि वळसंगकर कुटुंबात संपत्तीवरुन वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. सहा महिन्यांपूर्वी डॉ. शोनाली आणि डॉ. उमा वळसंगकर यांच्यात वाद झाला होता आणि ते प्रकरण पोलिस आयुक्तालयापर्यंत पोहचल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी हे प्रकरण दिवाणी असून तुम्ही न्यायालयात जा असा सल्ला दिला. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी अर्ज मागे घेत प्रकरण सामोपचाराने मिटविण्याबाबत सांगितले. परंतु त्यात यश आले नाही. आता जून महिन्यात पुन्हा हा वाद उफाळून आल्याचे दिसते.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी २०२० साली मृत्यूपत्र केले होते. त्यानुसार त्यांची बँक खात्यातील रकमा, जमिनी यांची वाटणी झाली आहे. वळसंगकर हॉस्पिटल चालविण्यासाठी दहा वर्षांत मी अनेक खस्ता खाल्ल्या स्वतःचे पैसे लावले. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये माझा हिस्सा असल्याचे डॉ. शोनाली यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात डॉ. आश्विन वळसंगकर यांची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही.