

सोलापूर : एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्स म्हणजेच वळसंगकर हॉस्पिटलच्या फलकावरून डॉ. शोनाली वळसंगकर आणि डॉ. दिलीप जोशी यांची नावे पुसली आहेत. त्याच बरोबर ओपीडीसाठी असलेल्या केबीनवरील त्यांची नेमप्लेटही काढून टाकण्यात आली आहे. यामुळे वळसंगकर कुटुंबात गृहकलह होताच, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येनंतर संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या अटकेपासून अनेक घडामोडी घडत आहेत. डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येला एकटी मनीषाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील गृहकलही कारणीभूत असल्याची चर्चा पहिल्या दिवसांपासून रंगली आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
आता तर त्यांच्याच सून आणि तिच्या वडिलांच्या नेमप्लेटही काढून टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. डॉ. शोनाली वळसंगकर आणि डॉ. दिलीप जोशी यांची ज्या केबिनमध्ये ओपीडी चालायची तेथील त्यांच्या नेमप्लेटही काढून टाकण्यात आल्याचे दिसून आले. डॉ. शोनाली या न्युरो सर्जन असल्याने त्यांची हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र ओपीडी चालायची. परंतु डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये येणे बंद केले. तेव्हापासून त्यांची ओपीडी बंद आहे. डॉ. दिलीप जोशी हे मधुमेहविकार तज्ज्ञ आहेत. त्यांची ओपीडी देखील तेव्हापासून बंद आहे. आता त्यांची नावेही कमी करण्यात आल्याने वळसंगकर घराण्यातील गृहकलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येला केवळ मनीषा जबाबदार नसून त्यामागे गृहकलह असल्याची शंका अनेकजण व्यक्त करीत आहेत. मात्र पोलिसांचा तपास केवळ मनीषा आणि तिच्या आर्थिक गैरव्यवहाराभोवती फिरत आहे. त्यामुळे पोलिसांचे वळसंगकरांच्या गृहकलहाकडे असलेले दुर्लक्ष जाणीवपूर्वक की अनवधानाने याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. मनीषाने देखील गृहकलहाचा मुद्दा पोलिसांना सांगितल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली. तरीही पोलिसांनी या मुद्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
मनीषाने डॉक्टरांना पाठविलेला ई मेल, तिची संपत्ती, डॉ. शिरीष यांना दिलेली धमकी याचा तपास मनीषाच्या एकूण सात दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान करण्यात आला. असे असले तरी न्यायलयात म्हणणे मांडताना पोलिसांनी कधीच वळसंगकरांच्या गृहकलाचा विषय मांडला नाही. त्यामुळे वळसंगकरांच्या गृहकलहाच्या मुद्याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची शंका व्यक्त होत आहे.