

सोलापूर : न्युरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा गुंता आणखी वाढत चालल्याचे दिसत आहे. वळसंगकरांचे चिरंजीव डॉ. आश्विन यांनी दिलेली फिर्याद आणि पोलिसांच्या जबाबात तफावत असल्याचे समोर आले. डॉ. शिरीष यांचे शवविच्छेद करतेवेळी मृतदेहावरील कपडे फाडताना चिठ्ठी सापडल्याचे एफआयआर मध्ये नमूद आहे. तर वळसंगकर हॉस्पिटलमध्ये कपडे ताब्यात घेतल्यानंतर दुसर्या दिवशी तपासणीवेळी चिठ्ठी सापडल्याचा जबाब पोलिसांनी दिला आहे. अशा प्रकारे डॉ. आश्विन आणि पोलीस अशा दोघांच्याही जबाबात तफावत आल्याने हे दोघेही कुणालातरी वाचवताहेत असा संशय व्यक्त केला जात आहे.
डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्या अगोदर तपास अधिकार्यांनी न्यायालयात संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या दोषारोप पत्रामध्ये संपूर्ण घटनेचा इतिवृत्तांत आणि जबाब जोडण्यात आले आहेत. पान क्रमांक 273 वर पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रावसाहेब साखरे आणि 274 वर पोलीस हवालदार प्रमोद विठ्ठल गायकवाड यांचे जबाब नोंदविले आहेत.
डॉ. शिरीष यांनी 18 एप्रिल रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी वळसंगकर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी डॉ. शिरीष यांचा निळ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पॅन्ट पोलीस उपनिरीक्षक साखरे यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर ते कपडे पोलीस हवालदार गायकवाड यांनी स्वतःजवळ ठेवले. दुसर्या दिवशी मोदी पोलीस चौकीतील कपाटात हे कपडे ठेवण्यात आले. डॉ. आश्विन आणि दोन पंचासमक्ष हे कपडे पोलीस उपनिरीक्षक व्हट्टे यांना देण्यात आले. कपड्यांची तपासणी केली असता चिठ्ठी मिळून आली असल्याचे जबाबात नमूद आहे. हे दोन्ही जबाब 21 एप्रिल रोजी घेण्यात आले आहेत.
डॉ. आश्विन यांनी 19 एप्रिल रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी सदर बझार पोलीस ठाण्यात मनीषाच्या विरोधात एफआयआर दाखल केला. त्यामध्ये पोलिसांनी सदर बझार पोलीस ठाण्यात डॉ. आश्विन यांना बोलावून समक्ष सांगितले की, डॉ. शिरीष यांचे शवविच्छेदनावेळी कपडे फाडून ते पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्या कपड्यांची झडती घेतली असता डॉ. शिरीष यांच्या पॅन्टच्या डाव्या खिशात चिठ्ठी मिळून आली.
डॉ. आश्विन आणि पोलीस अशा दोघांच्याही जबाबातील तफावत पाहता पोलिसांचा जबाब खरा असेल तर डॉ. आश्विन हे कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच डॉ. आश्विन यांचा जबाब खरा की खोटा, त्यामागे कुणाला वाचविण्याचा प्रयत्न होतोय का. असा संशय व्यक्त केला जात आहे.
एकूणच या प्रकरणात डॉ. आश्विन यांचा जबाब आणि पोलिसांची, तपास अधिकार्यांची भूमिका ही शंका, संदिग्धता निर्माण करणारी असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची वस्तुनिष्ठपणे तपासणी होण्यासाठी याचा तपास सीआयडी मार्फतच व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. याविषयी दैनिक ‘पुढारी’ने अनेकदा आवाज उठवला आहे. पोलिसांच्या जबाबातील तफावतीमुळे आता सीआयडी चौकशीच्या मागणीला बळकटीच प्राप्त झाली आहे.