

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील सात जणांचे सीडीआर जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, सरकार पक्षाने केवळ एका मोबाईलचे सीडीआर जमा केले, त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. उरलेल्या सहा जणांचे सीडीआर जमा करण्यासाठी सरकार पक्षाने मुदत मागितली. त्यावर मनीषाच्या वकिलांनी हरकत घेतली असून त्याची पुढील सुनावणी तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मनीषा मुसळे माने यांचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी वळसंगकर कुटुंबीयांसह सात जणांचे मोबाईल सीडीआर, लोकेशन मिळावे, अशी मागणी न्यायालयात केली होती. याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी 17 जानेवारी रोजी सात जणांचे चार महिन्यांचे सीडीआर जमा करण्याचे आदेश दिले होते. सरकार पक्षाने 17 रोजी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मोबाईलचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन जमा केले. त्याबाबत शुक्रवारी सुनावणी पार पडली. इतर सहा जणांचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन का जमा केले नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली.
याबाबत तपास अधिकाऱ्यांना ताबडतोब न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी सहा जणांचे मोबाईल सीडीआर आणि टॉवर लोकेशन लवकरात लवकर जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मनीषाच्या वकिलांनी त्याला हरकत घेतली. किती तारखेला डाटा जमा करण्यात येईल, याबाबत विचारणा करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयाने तीन फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.
शुक्रवारी न्यायालयात तपास अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यांना इतर सहा मोबाईलचे सीडीआर आणि लोकेशन जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता तीन फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती ॲड. प्रशांत नवगिरे यांनी दिली.