

सोलापूर : न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या निकटवर्तीय असलेल्या हॉस्पिटलमधील निवडक कर्मचार्यांचे जबाबच पोलिसांनी घेतले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. असे करून पोलीस यामधून कुणाला वाचविण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
डॉ. शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणात वळसंगकर कुटुंबीय आणि हॉस्पिटल मधील काही कर्मचार्यांचे मंगळवारी (दि.20) न्यायालयासमोर जबाब घेण्यात आले. यामध्ये हॉस्पिटलमधील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचा समावेश होता. मनीषा ही संशयित आरोपी असल्याने हॉस्पिटलमधील तिच्या निकटवर्तीय कर्मचार्यांकडून महत्त्वाची माहिती मिळू शकते. परंतु नेमके तिच्या निकटवर्तीय असलेल्या आठ ते दहा कर्मचार्यांचा जबाबच घेतला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मनीषा हॉस्पिटलमध्ये नेमके काय काम करत होती, हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा होत होता, पैसे नेमके कोणकोणत्या फर्मच्या खात्यावर जमा होत होते यासह अनेक छुप्या गोष्टी यातील म्हणजे पोलिसांनी जबाब न घेतलेल्या काही कर्मचार्यांना माहीत असल्याची खात्रीशीर माहिती हॉस्पिटलमधील कर्मचार्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. खरोखरच या प्रकरणात ही माहिती खूप संवेदनशील व तपासास योग्य दिशा देणारी आहे. तरीही अशा काही निवडक कर्मचार्यांचा जबाब पोलिसांनी का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
संशयित आरोपी मनीषाच्या निकटवर्तीय कर्मचार्यांना ‘सेफ’ ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, अशी चर्चा होत आहे. कारण पोलिसी खाक्या दाखविताच अनेकजण तोंड उघडतात. अशातच मनीषाच्या निकटवर्तीयांना जर पोलिसांनी जबाबासाठी बोलावले तर अनेक प्रकरणे बाहेर येतील अशी शंका काहींना वाटते. त्यामुळेच त्यांचा जबाब घेऊ नये यासाठी पडद्यामागे खूप हालचाली झाल्याचीही चर्चा आहे. यातून नेमके कुणाला वाचविण्याचा प्रयत्न होतोय, अशी चर्चा आहे.
संशयित आरोपी मनीषाने हॉस्पिटलमधील अनेक कर्मचार्यांना मोठी आर्थिक मदत केली. मनीषाचे सर्व व्यवहार बिनबोभाट सुरू ठेवण्यासाठी काही मंडळी कार्यरत होती. त्या बदल्यात मनीषा त्यांना भरभरून मदत करीत होती. यातील काहींना तिने जुळे सोलापूर परिसरात आलिशान घरेही बांधून दिल्याचे समजते, काहींच्या घरांचे बांधकाम अद्यापही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.