

सोलापूर : एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्स म्हणजेच वळसंगकर हॉस्पिटल मधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनीषा मुसळे-माने हिची चौकशी करण्याची मागणी डॉ. उमा वळसंगकर यांनी पोलिसांकडे केली आहे. तर दुसरीकडे मनीषा आणि त्यांच्या पतीला पत्र पाठवून मनीषावर कोणतेही आरोप नसल्याचे सांगितले आहे. डॉ. उमा यांच्या या दुहेरी भूमिकेमागे दडलेय काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
न्यूरोफिजिशन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिलला आत्महत्या केली. त्यावेळी त्यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून मुलगा डॉ. आश्विन यांनी प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-मानेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार मनीषाला अटक हेाऊन तब्बल दोन महिन्यांनंतर जामीन मिळाला. या प्रकरणात सर्वात चर्चेला गेलेला विषय म्हणजे वळसंगकर हॉस्पिटलमध्ये मनीषाने केलेला आर्थिक कथित गैरव्यवहार. मनीषाच्या या आर्थिक कथीत गैरव्यवहारावर लक्ष केंद्रित करीत पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला.
दरम्यान, सरकारी वकिलांनी पोलिसांना पत्र पाठवून मनीषाने केलेल्या आर्थिक कथीत गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार याविषयी आपणास चौकशी करायची आहे का अशा आशयाचे पत्र पोलिसांनी पाठविले. त्यावर हॉस्पिटलच्या वतीने डॉ. उमा वळसंगकर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात पत्र देऊन मनीषाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे डॉ. उमा यांनी ही मागणी केली तर दुसरीकडे 29 एप्रिल रोजी त्यांनी मनीषा आणि त्यांचे पती महेश माने यांना कुरिअरव्दारे पत्र पाठवून मनीषावर कुठलेही आरोप नसल्याचे म्हंटले आहे. तुमच्यावर कोणतेही आरोप न ठेवता तसेच कोणताही ठपका न ठेवता तुमची हॉस्पिटल मधील सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे त्या पत्रात म्हंटले आहे. त्यावर मनीषाचे पती महेश माने यांनी आपण दुःखात असतानाही आमच्या बद्दल सहानभूती दाखल असल्याचे पत्र डॉ. उमा यांना पाठविले आहे. डॉ. उमा वळसंगकर यांच्या या दुहेरी भूमिकेमागे नेमके काय दडले आहे याची चर्चा सध्या सुरू झालीय.