

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. दिलीप माने आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे गटाला 13 जागा मिळाल्या आहेत. आ. सुभाष देशमुखांच्या गटाला तीन तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने बाजार समितीवर आ. कल्याणशेट्टी, माने, हसापुरे गटाची सत्ता आली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात कल्याणशेट्टी गटाला 11, ग्रामपंचायतमध्ये एक आणि हमाल-तोलार मतदारसंघात एक अशा एकूण 13 जागांवर विजय मिळाला. ग्रामपंचायतींच्या चार जागांपैकी आ. सुभाष देशमुख यांना तीन जागा मिळाल्या. व्यापारी मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले. आ. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलने ग्रामपंचायत मतदारसंघातून तीन जागा जिंकून बाजार समितीत खाते उघडले. कल्याणशेट्टी गटाने सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून सोसायटीच्या सर्व 11 उमेदवार 800 मतांच्या फरकाने विजय मिळविला. तर ग्रामपंचायतमधील चार पैकी फक्त एकच जागा त्यांना मिळाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मतदारसंघात आ. देशमुख यांचा दबदबा दिसला.
दिलीप माने गटातून ग्रामपंचायत मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव झाला. आ. कल्याणशेट्टी, माने, हसापुरे गटाची मोठी ताकद असतानाही वानकर यांचा पराभव कसा झाला, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण पाच हजार 227 मतदान झाले होते. त्यातील 337 मते विविध कारणांमुळे बाद झाली आहेत. तर चार हजार 890 मते वैध ठरली.