

पोखरापूर : शारीरिक तंदुरुस्त वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणीची तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करताना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्या तरूणीच्या तक्रारीवरुन डॉक्टरच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना दि. २१ जून रोजी मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथे ही घटना घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील शिरापुरसो येथे असलेल्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पीडिता वैद्यकीय शारीरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र आणण्यासाठी दि. २१ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अमित रमेश गायकवाड वय ४२ रा. शिरापुर ता. मोहोळ याने संबंधित पीडितेची तपासणी करत असताना त्या पीडीतेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. संबंधित पीडितेने यासंदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात त्या डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्णेवाड करत आहेत.
पीडितेने डॉक्टरच्या कृत्याबद्दल पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर पालक संबंधित डॉक्टरकडे जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवी केली. मात्र पिडीता व तिचे पालक तसेच इतर नातेवाईक डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने स्वतःच रुग्णालयातील खोलीचे दार बंद करून घेतले. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरला दार उघडायला लावून मोहोळ पोलीस ठाण्यात आणले. या घटनेमुळे मात्र मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा शिरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेत आले आहे.