

पोखरापूर : गणेशोत्सव मंडळांच्या ‘डीजे’ संदर्भात कोणत्याही नेत्याचा मला फोन येत नाही आणि जरी आला, तरी मी कारवाई थांबवणार नाही. वर्गणीच्या नावाखाली कुणी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला तर मला फोन करा, असे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगेंनी ठणकावून सांगितले. मोहोळच्या हद्दीत कोणत्याही मंडळाने ‘डीजे’ लावल्यास त्याच्या चालकावर, मंडळ पदाधिकार्यांवर कडक कारवाई होईल, असाही सज्जड दम त्यांनी दिला.
निमित्त होते गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मोहोळमधील शांतता कमिटीच्या बैठकीचे. दैनिक ‘पुढारी’ने मार्च महिन्यापासूनच ‘डीजे’विरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यानुसार याविषयी रोखठोकपणे वार्तांकन ‘पुढारी’मध्ये रोजच प्रसिद्ध होत आहे. त्या भूमिकेशी संलग्न भूमिका मोहोळ पोलिसांनी घेतली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक अतकरे, किरण पाटील यांच्यासह बुद्धिजीवी, गणेश मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. उपस्थितांनी ‘डीजे’ बंदीची मागणी केली.