

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात गणेशोत्सव काळात डीजे, लेसर लाईटवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने आज घेतला. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी काढला. बंदी आदेश मोडणार्यांवर फौजदारी कारवाईचा इशाराही त्यामध्ये देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवासह अन्य उत्सव आणि मिरवणूक म्हणजे डीजे, लेसर लाईट असे समीकरणच बनले आहे. डीजे आणि लेसर लाईटमुळे अनेकांना कानाचे, हृदयाचेे त्रास झाले. काहींना अंशतः तर काहींना कायमचे बहिरेपण आले. काहींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. लेसरमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली.
या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’ने सर्वात प्रथम मार्च महिन्यापासून डीजेविरुद्ध वार्तांकन करत जनजागृतीस सुरुवात केली होती. वृत्त, विशेष लेख, स्तंभलेखांद्वारे ‘पुढारी’ने ‘डीजे’विरुद्ध जनमत तीव्र करण्यात यश मिळवले. अखेर ‘पुढारी’च्या या मानवतावादी लढ्यास आज यश आले, ते जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या डीजे, लेसर लाईट शो बंदीच्या आदेशाने. डीजे, लेसर लाईटवर बंदीची भूमिका ‘पुढारी’ने घेतली. त्यास सजग सोलापूर मंच, ज्येष्ठ नागरिक संघटना, कान-नाक-घसा तज्ज्ञ, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डीजे व लेसर लाईटमुळे जीवितास धोका, इतर शारीरिक दुष्परिणाम होत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली होती. या सगळ्याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी डीजे, लेसर लाईटवर बंदी घातली.
प्रांताधिकार्यांच्या अहवालाचाही हवाला
श्री गणेश आगमन, विसर्जन मिरवणूक दरम्यान डीजेमुळे कानास व हृदयाचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व येऊन जीवाला धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आल्याचा अहवाल उपविभागीय अधिकार्यांनी क्रमांक 1 (प्रांताधिकारी) 27 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांना सादर केला होता. त्याचाही हवाला घेत हा डीजे, लेसर लाईट बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.