

सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी कांदा चाळीतील कांदा उपलब्ध होणार आहे. कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने कांद्याच्या चाळीमध्ये साठवण केलेला कांदा उपलब्ध होईल. यामुळे पुढील दोन महिने तर कांद्याचे भाव स्थिर राहतील. तसेच दिवाळीत नागरिकांना स्वस्त कांदा मिळू शकेल.
राज्यात 120 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह नाशिक, नगर, धुळे, जळगाव, पुणे जिल्ह्यातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे. मात्र, राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने 20 ते 30 रुपये किलोने कांद्याची किरकोळ बाजार विक्री होत आहे. राज्यात लाखो टन कांदा कांदाचाळीत पडून असून, तो कांदा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अखेरपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात कांद्याचे दर वाढणार असल्याचा अंदाज कांदा व्यापार्यांनी व्यक्त केला आहे. फेबु्रवारी महिन्यात रब्बी हंगामातील नवा कांदा बाजार उपलब्ध होणार आहे. त्या कांद्यास चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षाही कांदा व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सध्या सोलापूर जिल्ह्यातील, राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून होत होती. मात्र, राज्यात मुबलक कांदा उपलब्ध असल्याने सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत.
आवक कमी असूनही भाव मिळेना
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. 3) फक्त 46 ट्रक कांद्यांची आवक झाली आहे. त्या कांद्याला सरासरी दर 1150 रुपये तर सर्वातकमी दर 100 रुपये मिळाले आहे. आवक कमी झाल्यानंतर भाव जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, बाजारात मुबलक कांदा असल्याने बाजार समितीमध्ये कमी भाव मिळत आहे.
कांदा उत्पादनात प्रमुख जिल्हे
नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, पुणे आणि सोलापूर जिल्हा कांदा उत्पादनात राज्यात अग्रेसर जिल्हे आहेत. तर सातारा, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात मध्यम प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.