

अकलूज : केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांना फायदा होणार आहे. खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागणी केली होती.
जिल्ह्यात सुमारे 19 हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातीपैकी 58 टक्के निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते. जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघटना आणि निर्यातदारांना पायाभूत सुविधा उभारणीसाठी तसेच केळी आणि इतर फळे-भाज्यांची गुणवत्ता तपासणी, विक्रीनंतर व्यवस्थापन करण्यासाठी इन-हाऊस प्रयोगशाळा उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे. एपीईडीएच्या आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत तीन एकत्रित पॅक हाऊस आधीच स्थापन झाले आहेत.