

सोलापूर : पंढरपूर येथील एका पेट्रोल पंपास जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मंगळवारी (दि.26) अचानक भेट देऊन तपासणी केली. तसेच पेट्रोल, डिझेलचा साठा न करता इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आवाहन पंपधारकास केले.
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या अनधिकृत साठवणुकीसह काळाबाजार रोखण्यासाठी तसेच काही नागरिकांकडून पेट्रोल विक्रेत्यांकडून पेट्रोल डिझेलचे शॉर्ट सेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर तपासणी केली. या ठिकाणी सर्व बाबी व्यवस्थित असल्याचे आढळून आले.
प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी तालुक्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई होणार नाही, यादृष्टीने लक्ष ठेवण्याबाबत निर्देश दिले. तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंपाची तपासणी करावी. ग्राहकांना सुरळीत इंधन पुरवठा होईल, यासाठी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले आहे.