

सोलापूर : डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. यू. एस. सुतार, कॅम्पस इन्चार्ज कीर्ती भोसले यांनी दिली.
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी स्वेरी पंढरपूर व्यवस्थापनाच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संस्थेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रामध्ये ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग व अपलोडिंग, कागदपत्रांची पडताळणी तसेच अर्ज निश्चिती या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत.
रविवारी सुरू राहणार सुविधा केंद्र
तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 20 मे ते 22 जून या कालावधीत प्रवेश अर्ज निश्चिती प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता हे सुविधा केंद्र रविवारसह सर्व दिवस सुरू ठेवण्यात आले आहे.
विविध प्राध्यापकांचे मिळणार मार्गदर्शन
सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजना, शासकीय सवलती, डिप्लोमा नंतरच्या नोकरी व व्यवसायाच्या संधी तसेच ‘कॅप राउंड’ प्रक्रियेबाबत तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. यू. एस. सुतार यांनी दिली.