

माढा : दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबतच्या निर्णयावर कार्यकर्ते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विचार घेऊन त्यावर मत प्रदर्शित करणे योग्य राहील. अद्याप याबाबत पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नसल्याचे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले. माढ्याचे आ. अभिजित पाटील मात्र दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, असे मत व्यक्त करत आहेत. यावरुन खा. धैर्यशील मोहिते-पाटील व आ.अभिजित पाटील यांची या विषयाबाबत मतभिन्नता असल्याचे स्पष्ट होते.
माढ्याचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा तालुक्याच्या दौर्यावर असताना त्यांनी माढा येथे आ. अभिजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामकाका मस्के, माजी जि.प.सदस्य आनंदराव कानडे, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी, दिनेश जगदाळे, माजी नगरसेवक शहाजी साठे, आबासाहेब साठे, ओबीसीचे शहराध्यक्ष बापू राऊत उपस्थित होते.
यावेळी खा. मोहिते-पाटील म्हणाले की, मी माढा लोकसभा मतदारसंघात खा. शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विचारांना मानणार्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडून आलो आहे. त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून एकत्र येण्याच्या प्रश्नावर निर्णय घेता येईल. मात्र याबाबत अद्यापपर्यंत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी कोणतीही विचारणा केली नाही. मी केंद्रात काम करत असताना मला निधीबाबत कोणतीही अडचण आली नाही. मी सुचवलेली सर्व कामे होतात त्यामुळे याबाबत माझी काही अडचण नाही.
यापूर्वी आ.अभिजित पाटील यांनी दोन्ही पवारांनी एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आपण खा. शरद पवार, आ.जयंत पाटील खा.सुप्रिया सुळे यांना प्रत्यक्ष भेटूनही ही अपेक्षा व्यक्त केली आहे. विरोधी पक्षाचा आमदार असल्याने निधी मिळवण्यात अडचणी येत आहेत. मतदारसंघातील प्रलंबित कामे होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. दोघे एकत्र आले तर हा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आता प्रथमच खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी त्या मताशी सहमत न होता हा निर्णय कार्यकर्ते व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय यावर भाष्य करता येणार नसल्याचे सांगत आमदारांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका व्यक्त केल्याने दोघांमधील मतभिन्नता समोर आली आहे.