

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यामुळे डायटकडून बुधवारपासून (दि. 2) पहिलीच्या शिक्षकांना सीबीएसईचे धडे देण्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम सुरू झाला आहे. पहिलीच्या वर्गासाठी अभ्यासक्रम निश्चित केला आहे. या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रशिक्षण देणे गरजेचे होते. मात्र शिक्षक बदलीमुळे प्रशिक्षणास विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने पहिलीच्या शिक्षकांना सीबीएसईचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरम्यान, सीबीएसई अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर शाळेच्या पहिले पंधरा दिवस कोणता अभ्यासक्रम शिकवण्यात आल्याचा सवाल पालकांतून विचारला जात आहे.
कुंभारी विडी घरकुल येथील मार्कंडेय हायस्कूलमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येत आहे. मराठी माध्यमाच्या पहिली वर्गासाठी अध्यापन करणार्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली वर्गाचे अध्यापन सुरू होणार आहे.