Pandharpur News | पालखी मार्गानंतर आता मिशन 'स्वच्छ पंढरपूर'

यापुढे विकास आराखड्याचा मोठा निधी स्वच्छ, सुंदर पंढरपूरसाठी खर्च होईल : फडणवीस
Pandharpur news
पालखी मार्गानंतर आता मिशन 'स्वच्छ पंढरपूर'file photo
Published on
Updated on

मुंबई : दरवर्षी हरीनामाचा गजर करीत श्री विठ्ठलाच्या भेटीस पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा पालखी मार्ग तब्बल ११ हजार कोटींची योजना अंमलात आणत प्रशस्त केल्यानंतर आता 'स्वच्छ पंढरपूर' मिशन हाती घेण्यात येत असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आषाढी आणि कार्तिकी वारीला वारकऱ्यांना अनेकदा अपघात होत. दुर्दैवी मृत्यू ओढवत. अनेकदा वारकऱ्यांच्या दिंडीत वाहने घुसली, भरधाव गाड्यांनी धडक दिली म्हणूनही वारकऱ्यांचे मृत्यू झाले. पंढरपूर वारी ही भक्तांसाठी दीर्घकाळापासून एक आध्यात्मिक यात्रा राहिली असतानाही या यात्रेचा मार्ग असुरक्षित म्हणूनच ओळखला जावू लागला. ही वारी सुरक्षित करण्याचे आव्हान स्वीकारून फडणवीस यांनी महामार्ग प्रकल्पांची कल्पना पुढे आणली आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदाजे १२,२९४ कोटी रुपये खर्चाच्या १३ प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये २२१ किलोमीटर लांबीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (एन. एच. ९६५) आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (एन. एच. ९६५ जी) यांचा समावेश आहे, या दोन्ही पालखी मार्गावर अनुक्रमे ६,६९० कोटी रुपये आणि ४,४०० कोटी रुपये खर्च झाला. ज्यात दोन्ही बाजूंना 'पालखी' साठी पूर्ण पदपथ आहेत याची नोंद करत फडणवीस यांनी आता पंढरपूरला स्वच्छ करण्याचा मानस बोलून दाखवला. यापुढे पंढरपूरात मोठ्या प्रमाणात निधी हा स्वच्छता अबाधित राखण्यासाठी खर्च करण्यात येईल ज्यात अनेक महत्वाच्या योजना आखण्यात आल्या असून त्या लवकरच सत्यात उतरणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आषाढी एकादशीच्या वारीत २१ दिवसांमध्ये अंदाजे २५० किमी प्रवास वारकरी करतात. हा प्रवास जगातील सर्वात जुन्या समूह प्रवासांपैकी एक आहे आणि एक लोकचळवळ म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच या वारकऱ्यांना त्यांचे पंढरपूर स्वच्छ आणि सुंदर मिळावे म्हणून पंढरपूरच्या विकास आराखड्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि पावसाचे पाणी साठवण या घटकांचाही समावेश करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news