

सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौर्यावर येण्याची शक्यता आहे. याशिवाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय सिरसाट हे देखील बुधवारी (दि.24) सोलापूर दौर्यावर येणार आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी धाराशिव जिल्हा दौर्यावर होते. सायंकाळी ते सोलापूरकडे रवाना झाले. बुधवारी ते दिवसभर सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय सिरसाट हे देखील बुधवारी करमाळा दौर्यावर येत आहेत. यावेळी ते सुरुवातीला पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर या तालुक्यात आयोजित करण्यात आलेला मेळावा व अन्य खासगी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या 124 गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात शेतीचे तर नुकसान झाले, शिवाय अजूनही अनेक कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली आहेत. पुरात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी सैन्याची मदतही घेण्यात येत आहे.
प्रशासनाकडून हेलिपॅडचे नियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पूरस्थितीचा आढावाही घेतला. बुधवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पाहणीसाठी दौरा आखण्यात प्रशासनास सांगितले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री यांच्या हेलिकॉफ्टरसाठी हेलिपॅडच्या उभारणीचे नियोजन करण्यात आले.