

सोलापूर : शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा, यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ, म्हाडा विहीर विडी घरकूल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहाणी केली.
महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवर खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्या छाटणे, प्रकाशयोजना सुधारणे यासह आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचारी नेमण्यात आले असून, शहरातील एकूण 79 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे.11 विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे. 250 कर्मचार्यांची नियुुक्ती केली आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावे. विसर्जन स्थळावर पोलिस बंदोबस्त असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही नजर तसेच शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या वेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलिस उपायुक्त मुख्यलय गौहर हसन, पोलिस उपायुक्त विजय काबाडे, नगर अभियंता सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.