

कुर्डूवाडी : श्री क्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र शेगाव ह्या महाराष्ट्रातील दोन्ही धार्मिक स्थळांना जोडणारी रेल्वे एक्सप्रेस सेवा आषाढी वारीपूर्वी सुरू करावी, त्याचप्रमाणे या गाडीला 'आनंदवारी एक्सप्रेस' असे नाव द्यावे अशी मागणी 'श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष निरज शहा व उदय होदाडे यांनी सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कुर्डूवाडी येथून थेट गाडी नसल्याने वृद्ध वारकरी आणि महिला भाविकांना प्रवासात वारंवार गाड्या बदलाव्या लागतात. बसमधील गर्दी आणि लांबच्या प्रवासामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत, तर एस.टी. प्रवासात मोठा वेळ वाया जातो. विदर्भ आणि मराठवाड्यातून अनेक भाविक महिन्याची वारी करण्यासाठी पंढरपूरला येत असतात.
मात्र पंढरपूर व शेगाव दरम्यान थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने भाविकांना एस.टी. बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.त्यामुळे सदर रेल्वे सेवा तत्काळ व कायम स्वरूपी करावी अशी मागणी केली आहे.