.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगोला : माझ्या कार्यालयावर जी छापेमारी झाली त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे खात्रीने वाटत नाही. हा सर्व प्रकार माझ्या पक्ष वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे. मला नाईंटीनाईन परसेंट असे वाटतंय की हे फडणवीस असे पाप करणारा माणूस नाही. हे सगळे स्थानिक विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आ. दीपकआबा साळुंके-पाटील यांचे कारस्थान आहे, अशी प्रतिक्रिया काय झाडी, काय डोंगार डायलॉगवाले सांगोल्याचे माजी आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकार्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला सोबत घेऊन रविवारी रात्री उशिरा सांगोल्यात माजी आमदार पाटील यांच्या कार्यालयासह त्यांच्या समर्थकांच्या घरी छापा टाकला. त्या पार्श्वभूमीवर माजी आ. पाटील माध्यमांशी बोलत होते.
अतिशय भावुक होत, डोळ्यात पाणी आणत माजी आ. पाटील म्हणाले, रविवारी सांगोल्याच्या इतिहासात सर्वात मोठी सभा झाली.
सभेनंतर मी थकल्यामुळे माझ्या कार्यालयामध्ये विश्रांतीसाठी आलो. तेवढ्यात सिव्हील ड्रेसवरील पाच-सहा लोक माझ्या कार्यालयात दिसली. ते मला म्हणाले तुम्ही फक्त बसून राहा. आम्हाला जरा बघायचे आहे. मी म्हणालो, काय ते स्पष्ट बोला. काय पैसे-बिसै बघताय का. बघा. हरकत नाही. मला लवकर घरी जायचंय. बराच वेळ मला त्यांनी बसवून ठेवले. मग मला उशीरानं समजलं माझ्या कार्यकर्त्यांच्या घरावरही असे काही सुरू आहे. ते सुरू असल्यामुळे मला बाहेर जाऊ दिले जात नाही. मग मी शांत राहिलो. हे सगळे सांगोल्याच्या इतिहासात म्हणजे 1952 सालापासून प्रथमच घडले. हे वेदनादायी आहे. राजकारण करावे की सन्यास घ्यावा असे हे सगळे आहे. मी आता विचार करणार आहे. वरिष्ठांची भेट घेऊन यातून बाहेर पडून थोडं घरच्या, शेतीवाडीच्या कामाला लागण्याचा विचार करतोय.
राजकारणात मला एकटं पाडलेय या गोष्टीला मी काय घाबरणारा नाही, असे सांगून पाटील े म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या भाई गणपतराव देशमुखांचा दबदबा होता. त्यांच्यासमोर मी एकटाच होतो. तेव्हाही मला कुणी साथ दिली नाही. पण आता मला ज्या पद्धतीने खेळवून म्हणजे बसायचे आहे, आपण एकच आहोत, जागा वाटप करायचे आहे, ठरवूयात, करूयात या गोष्टी करत मला अंधारात ठेवले आणि अचानक अर्ज भरण्याच्या रात्री मला निरोप आला की तुमचं आमचं जुळत नाही. तेथून उमेदवार शोधले. मग वीस उमेदवार आणणार कोठून अशा अचानक वेळी. मग केले झोपडपट्टीतले सुद्धा उमेदवार. गोरगरीबांना, उभा राहातो म्हणणार्या प्रत्येकाला निवडणुकीला उभा केले. सांगोल्यातील जनतेने राजकारण करताना स्वाभिमानाला धक्का कधीच लागू दिला नाही. जनतेने स्वाभिमान जागा ठेवावा. प्रत्येक नागरिकाने ही लढाई खेळणे गरजेचे आहे, असेही माजी आ. पाटील म्हणाले.
या कारवाईमागे नेमके कोण असेल या प्रश्नावर पाटील म्हणाले, यामागे माजी आ. दीपकआबा साळुंके-पाटील आहेत. त्यांना कोणत्याही पक्षात थारा मिळेना. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप अशा तिन्ही ठिकाणी ते वर्षभरापासून प्रयत्न करत आहेत, पण त्यांना कुठेच प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांनी जयकुमार गोरे यांना हाताशी धरून हे कारस्थान केले. जयाभाऊ या दीपकआबाच्या नादाला लागून काय बिघडलेय हेच मला समजेना. पण त्यांच्या या उद्योगाचा पुढच्या सगळ्या निवडणुकांवर परिणाम होईल. उद्या लोकसभेला जर भाजपचा उमेदवार इथं उभारला तर मी कसं मत मागू. लोकंच मला जोड्यानं मारतेल.शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापा; हाती काहीच नाही
सांगोला : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला सोबत घेऊन रविवारी रात्री माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर तसेच त्यांचे सहकारी रफिक नदाफ यांच्या घरी व भाजप कार्यालयावर छापा मारला. या छाप्यात पथकाच्या हाती काहीही आक्षेपार्ह असे आढळले नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान, निवडणुकीचा प्रचार संपत आला असताना व प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या असताना विरोधकावर छापासत्राचे अस्त्र उगारल्याने जनतेमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप व शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यानंतर रात्री जय भवानी चौकात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची जंगी सभा झाली. त्यानंतर माजी आ. पाटील हे त्यांच्या कार्यालयात पोहोचताच, निवडणूक आयोगाच्या भरारी (एफएमटी) पथकाने छापा टाकला.
छाप्यादरम्यान पोलिसांनी कार्यालयात कोणालाही आत-बाहेर होऊ दिले नाही. या कार्यालयातीलकागदपत्रे तपासली. कार्यालयातील विविध कपाटांची तपासणी केली. याचवेळी माजी आ. पाटील यांचे सहकारी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्या अयोध्या नगरी येथील घरावर दुसर्या पथकाच्या टीमने छापा टाकला. तेथेही कपाटाची व इतर ठिकाणची तपासणी केली. परंतु या दोन्ही ठिकाणी पथकांच्या सदस्यांना आक्षेपार्ह असे काहीच मिळाले नाही. यानंतर महात्मा फुले चौकातील भाजप शहर कार्यालयाच्या ठिकाणीही छापा टाकण्यात आला. याही ठिकाणीही संबंधितांना आक्षेपार्ह असे काही मिळाले नाही.