

अक्कलकोट : अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.
पहाटे पाच वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहितांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची काकडा आरती झाली. श्री दत्त जयंती निमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी स्वामी भक्तांचे अभिषेक बंद ठेवले होते. सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी श्री स्वामींना महानैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली.
दुपारी चार ते साडेपाच या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाचे श्री दत्त जन्म आख्यान व भजन पार पडले. सायंकाळी सहा वाजता स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल-पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम ज्योतिबा मंडपात पार पडला.
दुपारी 12 ते 3 या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्त निवास येथे स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी पाच वाजता सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभिक आरती पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या अधिपत्याखाली व्यंकटेश पुजारी व पुरोहितांच्या हस्ते झाली. श्री स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती. दर्शनानंतर प्रासादिक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झालेली होती. शहर पोलिस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरासह शहरातील विविध चौकात चोख बंदोबस्त होता.