Govind Barge death case: नर्तिका पूजा गायकवाडला मिळाला जामीन
सोलापूर : राज्यात गाजलेले सरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत येऊ लागले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी नर्तिका पूजा गायकवाड हिला जामीन मिळाला. बीड जिल्ह्यातील लुखा मसलाचे सरपंच गोविंद बर्गे यांनी नऊ सप्टेंबर रोजी बार्शीतील सासुरेमधील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर गाडीत रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
याबाबत बर्गे यांचे मेव्हणे लक्ष्मण चव्हाण (रा. नंदापूर, ता. जालना) यांनी तक्रार केल्यानंतर वैराग पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक केलेली होती. जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी केलेला युक्तिवाद मान्य करीत जामीन मिळाला.
घरासाठी होता पूजाचा तगादा
गोविंद बर्गे यांचे नर्तिका पूजा गायकवाड हिच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. पूजाने गोविंद यांच्याकडून वेळोवेळी पैसे, सोने-नाणे घेतले, तसेच स्वतःच्या मावशीच्या व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट, जमिनी घेतल्या. भावाच्या नावावर 5 एकर शेती कर, नाहीतर गेवराईतील घर नावावर कर, म्हणून पूजाने तगादा लावला होता. मी तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळेच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत आहे.

