

सोलापूर : नववर्षाचा पहिलाच आनंदी, उत्साही दिवस आणि याच नववर्षाच्या पहिल्याच रम्य सायंकाळी रंगणारा दैनिक ‘पुढारी’चा वर्धापनदिन, हे सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचे समिकरण. वातावरणातील हवाहवासा वाटणारा गारवा... वाफळत्या कॉफीचा मग... स्नेहीजनांशी विविध विषयांवर रंगणाऱ्या गप्पाटप्पा... हास्यांचे फवारे तर कुठे धीरगंभीर विषयांवर चर्चा... त्यातच यंदा महानगरपालिका निवडणुकीच्या आतल्या गोटातील गप्पाटप्पा अन् उमेदवारांविषयी अंदाज व्यक्त करण्याचा सर्वांना हवाहवासा वाटणारा उपक्रम म्हणजे दैनिक ‘पुढारी’चा वर्धापनदिन स्नेहमेळावा. समस्त सोलापूरकरांचे लाडके दैनिक असलेला ‘पुढारी’ गुरूवारी (दि. 1) 88 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे हेरिटेज मंगल कार्यालयाच्या लॉनवर सायंकाळी सहा वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल.
रोखठोक पत्रकारिता...
सोलापूर शहरातील सर्वात डोकेदुखी ठरणाऱ्या सततच्या मिरवणुका आणि त्यातील ‘डीजे’चा त्रस्त करणारा आवाज बंद करण्यात ‘पुढारी’ने सर्वात प्रथम पाऊल उचलले. तप्त उन्हाळ्यात शहरात सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी सावली गायब होते. याला कारण शहरातील घटती वृक्षसंख्या. याविषयी सखोल अभ्यासांती सोलापुरात दोन व्यक्तींमागे फक्त एकच झाड असल्याची जळजळीत माहिती ‘पुढारी’ने सर्वप्रथम दिली. प्रतिव्यक्ती किमान चार वृक्ष हवे असल्याची पर्यावरण तज्ज्ञांची पुस्तीही ‘पुढारी’ने व्यवस्थेसमोर आणली. समांतर जलवाहिनी, टीईटी परीक्षेची काळी बाजू, शहर बससेवेचा विषय असे शहर-जिल्ह्याशी निगडीत असंख्य जिव्हाळ्याचे विषय ‘पुढारी’ने सातत्याने मांडून व्यवस्थेस बदलण्यास भाग पाडले आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ विषयक पुरवण्या
‘पुढारी’चा वर्धापन आणि नव्याकोऱ्या विषयाला वाहिलेल्या अभ्यासपूर्ण, संग्राह्य पुरवण्या हे समिकरणच आहे. यंदाही वर्धापन दिनानिमित्त ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयाला विशेष पुरवण्या ‘पुढारी’ गुरूवारपासून (दि. 1) प्रसिद्ध करत आहे. सोलापूर परिसरातील विविध तज्ज्ञांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणातून, विश्लेषणातून साकारलेल्या या पुरवण्या नक्कीच संग्राह्य व वाचकांना आवडतील अशा आहेत.