

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्त विजापूर रोडवरील सोरेगांव येथील सिध्देश्वर देवस्थानाच्या 20 एकर जागेवर जनावर बाजार भरवण्यात आला आहे. हे जनावर बाजार फुलले असून, या जनावरांच्या खरेदी विक्रीतून दररोज 80 लाखांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत आहे. दरवर्षी श्री रेवणसिध्देश्वर मंदिर परिसरात भरविण्यात येणारे जनावर बाजार यंदा प्रथमच सोरेगांव येथे भरविण्यात आल्याने या बाजारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे.
दररोज 150 हून अधिक जनावरांची खरेदी - विक्री होत असल्याचे दिसून येते. एक म्हैस किमान 50 ते 80 हजारांत विकली जात आहे. जाफराबादी म्हशीचे दर दीड लाख रुपयांच्या पुढे आहेत. दिवसांतून सूमारे 80 लाखांहून अधिक उलाढाल होत आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेशात मोठे डेअरी फार्म असून तिथे येथून म्हशी नेल्या जातात.
विशेष म्हणजे देशी गायी, वळू, जाफराबादी म्हैस आदी जनावरे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, इंडी, चडचण, मोहोळ, माढा, मंगळवेढा, कर्नाटक या भागातून विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील पहिल्या मंगळवारपासून जनावर बाजार भरण्यास सुरुवात होते. परंतू यंदा महापालिकेने रेवणसिध्देश्वर मंदिराजवळील जागा उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्याने एक आठवडा उशिराने जनावर बाजार सुरुवात झाली. त्यामुळे जनावर बाजार भरण्यावर परिणाम होईल असा अंदाज वर्तविला जात होता. परंतू उशिरा सुरु होऊनही जनावर बाजार फुलला आहे.