

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नित्यपूजेचा विधी अत्यंत भक्तिभावाने पार पडला. मंदिर समिती सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे आणि लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते पूजाविधी सपत्नीक संपन्न झाला. यावेळी चार लाखाहून अधिक भाविकांनी पंढरीत हजेरी लावली. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून आलेल्या भाविकांसाठी मंदिर समितीने दर्शनाच्या वेळेत योग्य व्यवस्था केली आहे. दर्शन मंडप, रांगा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लाईव्ह दर्शन आणि परिसर स्वच्छतेचीही विशेष दक्षता घेतली जात आहे. भाविकांसाठी विमा संरक्षणाचीही तरतूद करण्यात आली आहे.
गाभारा, सोळखांबी, संत नामदेव पायरी या ठिकाणी विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करून मंदिराला आकर्षक रूप दिलं आहे. गुलाब, कमळ, झेंडू, चाफा, शेवंती यांची सजावट भाविकांच्या नजरा वेधून घेत आहे. उष्णतेमुळे त्रास होऊ नये म्हणून दर्शनरांगेत कुलर, थंड पाणी, सरबत व मठ्ठा वितरित करण्यात येत आहे. आरोग्यदृष्टीने पत्रा शेड आणि दर्शन मंडपात वैद्यकीय सेवा, आयसीयू सुविधा व दोन अद्ययावत रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
गतवर्षीप्रमाणे अन्नछत्रही सुरू असून, भाविकांना साबुदाणा खिचडी व तांदळाची खिचडी वितरित केली जात आहे. सारडा भवन व ज्ञानेश्वर मंडपात देखील खिचडी वाटप सुरू आहे. चंद्रभागा वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम व दर्शन रांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले की, दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि प्रशासन त्यासाठी पूर्ण सज्ज आहे.
श्रींच्या गाभारा, सोळखांबी आणि श्री संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. कामिनी, गुलाब, झेंडू, ऑर्किड, चाफा, शेवंती, अष्टर, कमळ आदी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. ही सुंदर सजावट पुण्याच्या राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी सेवाभावी तत्त्वावर विनामूल्य केली आहे.