

कासेगाव (ता. द.सोलापूर)ः केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 ही 7 व 8 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व सोलापूर या केंद्रांवर होणार आहे. मात्र याच कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करून 7 फेब्रुवारी रोजी मतदान व 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी जाहीर करण्यात आल्याने शिक्षक वर्गात तीव्र संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची कर्तव्यावर नेमणूक करण्यात आली असून, अनेकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. त्याच वेळी CTET ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची पात्रता परीक्षा असल्याने शिक्षकांसमोर “निवडणूक कर्तव्य की भविष्यासाठीची परीक्षा” असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
विशेष म्हणजे, अनेक शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्याऐवजी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या दूरच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्र मिळाले आहे. 7 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा मतपेट्या जमा होण्याची शक्यता असून, त्यानंतर तात्काळ प्रवास करून दुसऱ्या दिवशी परीक्षा देणे अनेकांसाठी अशक्यप्राय ठरणार आहे. काही उमेदवारांची परीक्षा 7 तारखेला, तर काहींची 8 तारखेला असल्याने गोंधळ अधिक वाढला आहे.
CTET ही परीक्षा वर्षातून एकदाच किंवा दीर्घ कालावधीनंतर घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेला मुकणे म्हणजे शिक्षकांच्या करिअरवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित शिक्षकांनी निवडणूक प्रशासन व शिक्षण विभागाकडे निवडणूक कर्तव्यातून सूट देणे किंवा किमान पर्यायी व्यवस्था (रिझर्व स्टाफ) उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.