

सोलापूर : भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने इतर सरकारी योजनांप्रमाणेच प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान-आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत हंगामातील पीक विमा दाव्यांची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान-आधारित फळ पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 आणि मागील हंगामांसाठी डिबीटी (थेट लाभ हस्तांतरण) आधारित पीक विमा दाव्यांचे देशव्यापी वितरण होणार आहे. त्याची सुरूवात आज सोमवारी दि. 11 ऑगस्ट रोजी होणार असून, आभासी पद्धती लाभार्थ्यांसह अधिकार्यांनी उपस्थित राहावेत, असे पत्र पुणे कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सर्व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकार्यांना दिले आहेत. ही प्रक्रिया प्रत्येक हंगामात 3 टप्प्यांत केली जाणार आहे. सोमवार, दि. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, झुंझुनू, राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात, रब्बी हंगाम 2024-25 आणि मागील हंगामांसाठीच्या डिबीटी आधारित विमा दाव्यांच्या पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू केले जाईल. केंद्र शासनाकडून या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी विमा कंपन्या आणि राज्य सरकारांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यालये आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. तसेच आपले स्तरावरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयांनाही या संदर्भात सूचना द्याव्यात. तसेच तालुका स्तरावर शेतकर्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आपल्या जिल्ह्यातील विमा कंपनीला देण्यात यावेत. तसेच, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि लाभार्थी शेतकर्यांचा या कार्यक्रमातील सहभाग सुनिश्चित करावा, अशा सूचना मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी दिले आहेत.