

सोलापूर : महापालिका प्रशासनाकडून 70 फूट रोडवरील भाजी विक्रेत्यांवर चाललेली कारवाई त्वरित थांबवावी. चिप्पा मार्केटमध्ये बसण्याची सक्ती न करता 70 फूट रोडवरच भाजी विक्रीसाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी माकपच्यावतीने बुधवारी दि. 9 जुलै रोजी महापालिकेत आंदोलन करण्यात आले.
गळ्यामध्ये विविध भाज्यांचे हार घालून आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आंदोलकांना सामोरे गेले, त्यांनी आंदोलकांची मागणी फेटाळून लावत चिप्पा मार्केटमध्ये बसण्याची सक्ती केली. यावरून आंदोलन आणि प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात अॅड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, अकिल शेख, खाजाभाई करजगी, जफार शेख, महेश कसबे, हसन बागवान, चांद शेख, रुक्मिणी कावळे, शांताबाई कोळी यांच्यासह सत्तर फूटवरील भाजीविक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलकांनी महापालिकेत ठिय्या मारल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन चिप्पा मार्केटमध्ये बसण्याची सक्ती न करता 70 फूट रोडवर जागा द्यावी, अशी मागणी केली. मागणी बेकायदा असल्याने मागणी फेटाळून लावताच आंदोलनकर्ते आक्रमक झाले आणि प्रचंड घोषणाबाजी केली.