Solapur University: सोलापूर विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापक भरती रखडली

जाहिरात प्रसिद्ध होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला
Solapur University
Solapur University
Published on
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १२७ कंत्राटी सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीची जाहिरात ३० मार्च रोजी प्रसिद्ध केली होती. जाहिरात प्रसिद्ध होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुलाखतीही पार पडल्या आहेत. मात्र अद्याप अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

शासनाच्या नियमानुसार १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. एम.ए. द्वितीय वर्षाचे अध्यापन सुरू होणे अपेक्षित असताना अनेक विभागांमध्ये कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती झालेली नाही. दुसरीकडे एम.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र नियुक्त्या रखडल्याने अध्यापन, प्रवेश प्रक्रिया आणि विभागीय शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याची भावना विद्यार्थी व उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

मागील कंत्राटी सहायक प्राध्यापकांचा सेवाकाल ३१ मार्च रोजी संपला होता. त्यानंतरही विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अनेक प्राध्यापकांनी कोणतीही अधिकृत नियुक्ती किंवा मानधन नसताना प्रवेश प्रक्रियेसह विविध शैक्षणिक कामकाजात सहकार्य केले. तरीही भरती प्रक्रिया पूर्णत्वास न गेल्याने त्यांच्यातही नाराजी आहे.

विशेष म्हणजे, केवळ सोलापूर जिल्ह्यापुरते कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठात १२७ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची भरती तीन महिन्यांपासून प्रलंबित आहे. अंतिम निवड यादी तातडीने जाहीर करून नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून प्रशासनाकडे केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news